सांगली - महाविकास आघाडी सरकारबद्दलचे वातावरण भाजपाला त्रासदायक ठरत आहे. यामुळे त्यांच्य पायाखालची जमीन सरकली असल्याची टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. दिल्लीतील कृषी मोर्च्यादरम्यान झालेल्या हिंसाचारावर बोलताना, 'देशात लोकशाही राहिली नसल्याची टीका त्यांनी केली.
भाजपा नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून राज्यभरात पडसाद उमटत आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यावरून भाजपावर निशाणा साधला. भाजपाच्या पायाखालची वाळू घसरल्याचे सांगत, महाविकास आघाडीचे काम उत्तमरित्या चालले आहे, असे कदम म्हणाले. भाजपाला हे बघवत नसल्याने त्यांचे हे आरोप सुरू आहेत. चांगले काम सुरू असताना नारायण राणे यांनी कशाच्या आधारावर वक्तव्य केले, याबद्दल माहिती नसल्याचे कदम म्हणाले. तसेच महाविकास आघाडीबद्दल चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाला ते त्रास दायक ठरत असल्याचा टोला मंत्री कदम यांनी लगावला.
महाविकास आघाडीचा विजय निश्चित
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण असून सर्व ठिकाणी आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येतील, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.
देशातील लोकशाही संपली
कृषीकायद्याला विरोध करत दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीहल्ल्या केला. अनेक ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. धुराच्या नळकांड्यांसह तारांचे कुंपणही लावण्यात आले. यानंतर कदम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत संबंधित प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. ज्या पद्धतीने हा हल्ला झाला, तो पाहता देशातील लोकशाही संपली आहे, असे कदम म्हणाले. केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून अन्नदाता शेतकरी हक्कांसाठी लढत असताना लाठीचार्ज करणे दुर्दैवी असल्याचे मत कदम यांनी मांडले.