सांगली - राज्यावर कोरोनाचे संकट असताना गेल्या पंधरा दिवसात अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिले आहेत. जत तालुक्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या संकटातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कदम यांनी अतिवृष्टीनंतर डफळापूर-कुडनूर भागात दौरा केला. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी,प्रांत अधिकारी प्रशांत आवटे , तहसीलदार सचिन पाटील, बीडीओ अरविंद धरणगुत्तीकर, अप्पर तहसीलदार हनुमंत मैत्री, आप्पराय बिराजदार, जि.प.सदस्य सरदार पाटील, रविंद्र सावंत, प्रभाकर जाधव, बाबासाहेब कोडक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संक्रमण पूर्णत: संपले म्हणता येणार नाही. अजुनही पुढील काही काळ खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने 'माझे कुटुंब; माझी जबाबदारी' मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सर्वांचे सर्व्हेक्षण व्हावे. एखाद्या गावात लोक तपासणी करू देत नसल्यास पोलीस प्रशासनाची मदत घ्या, असे कदम म्हणाले. तसेच लवकरच अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय विभागातील रिक्त जागाही भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तातडीने पंचनामे करा
अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच तेथील अहवालही येत्या चार दिवसात पूर्ण करा. राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठल्याही संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. पीक विम्याच्या रक्कम देखील शेतकऱ्यांना देण्यात येतील.
पंचायत समिती सहाय्याक निबंधकाच्या तक्रारी
या बैठकीत जि.प.सदस्य सरदार पाटील, रविंद्र सावंत, आप्पराय बिराजदार ,विक्रम ढोणे यांनी पंचायत समितीच्या रोहयो गुरुकुल शौचालय,इ विषयावरून मंत्र्याकडे तक्रारी केल्या. कोरोनाच्या आड दडून पंचायत समितीचे बीडीओ व टिपीओ मनमानी कारभार करत आहेत. तसेच किरकोळ कामालाही पैसे मागतात. यावर मंत्री कदम चांगलेच भडकले. या प्रकरणाचा अहवाल मला दोन दिवसात मिळाला पाहिजे, असा भ्रष्टाचार व मनमानी कारभार मी खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.
बबलेश्वर योजनेचा करार
जतच्या पूर्व भागासाठी तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळावे, यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत सतत पाठपुरावा करत आहेत. यासंदर्भात मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांची बैठक झाली आहे. दोन्ही राज्ये या पाण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे हा करार नक्की होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.