सांगली - पद मिळाल्यामुळे सामान्य माणसाला न्याय देता येत नसेल, तर ते मंत्रिपदही काय कामाचे, असा म्हणत शेतकर्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी लढणार असल्याचे विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. शनिवारी सांगलीतील विटा येथीस शाळा नं. 2 च्या क्रीडांगणावर बच्चू कडू यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल सुतार व संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी
यावेळी मंत्री कडू म्हणाले, की मी स्वतःच्या परिवारासाठी किंवा मिरविण्यासाठी राज्यमंत्री झालेलो नाही. सर्वसामान्यांच्या सुखापेक्षा मंत्रिपद महत्त्वाचे नाही. त्यामुळे मी राज्यमंत्री झालो तरी शेतकऱ्यांसाठी लढतच राहीन. 2015 मध्ये सेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. चांगला अधिकारी असेल तर त्याला डोक्यावर घेऊ पण सर्वसामान्य जनतेची अडवणूक कराल तर, गाठ बच्चू कडूशी आहे, हे अधिकार्यांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - वसंतदादा बँकेच्या इमारतींच्या लिलावास स्थगिती, वसुली करून देणी भागवण्याचा सरकारचा निर्णय
सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. सर्वसामान्यांची अडवणूक कराल तर याद राखा. आम्ही देखील कायद्याचे भक्त आहोत. त्यामुळे सेवा हमी कायदा मोडणार्या अधिकार्यांची गय करणार नाही. कडू पुढे म्हणाले, दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकर्यांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांच्या वरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच जे नियमित कर्ज फोडतात त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार आहे. त्यामुळे हा कर्जमाफीचा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे.
अनाथांसाठी गेल्या 70 वर्षांत विधानसभेत एकही लक्षवेधी मांडली गेली नाही. पण मी आमदार झाल्यापासून गेल्या 15 वर्षांत 3 लक्षवेधी मांडून अनाथांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. कांद्याचे दर वाढल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकर्यांनाच होणार होता. परंतु कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकताना केंद्र सरकारला का लाज वाटली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार कांद्याच्या वाढत्या दराच्याबाबतीत चिंतित होते. पण गेल्या साडेतीन वर्षांत साडेतीन लाख शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावेळी सरकार का गप्प होते, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
यावेळी सातारा, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज खलाटे, सातारा जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, नरेंद्र झहीर, रवी शिंदे, अॅड. तानाजी जाधव, सत्यवान माने, रामभैय्या शिंदे, महेश जगदाळे, भरत कांबळे, अमोल चौगुले, संजय कडोले, संतोष कदम, सागर व्हनकाळे, महेंद्र कदम, सुरेश भिंगारदेवे, सुशांत पाटील, किरण माने, नितीनराजे जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन धीरजकुमार भिंगारदेवे यांनी केले. आभार सत्यवान माने यांनी मानले.
बहिर्जी नाईक समाधीस्थळापर्यंत रस्ता करण्याचे आश्वासन
बानूरगड येथील ऐतिहासिक बहिर्जी नाईक समाधीस्थळापर्यंतचा रस्त्याचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न राज्यमंत्री म्हणून लक्ष घालून स्थानिक आमदारांशी चर्चा करून राज्य शासनामार्फत रस्ता करू, असे आश्वासन मंत्री कडू यांनी दिले.