सांगली - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयात योग्य भूमिका मांडत आहे, आणि देवेंद्र फडणवीस सरकारने नियुक्त केलेल्या 2 वकिलांबरोबर आघाडी सरकारने आणखी दोन वकील नियुक्त केल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चांदोली धरण आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्तांसाठी धडक मोहीम
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली आहे. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी बोलताना सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांच्या पुनर्वसनासाठी 13 जानेवारीपर्यंत विशेष धडक मोहीम राबवणार असून, या माध्यमातून पुनर्वसनग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांच्या जमीन किंवा इतर मूलभूत प्रश्न सोडवून पुनर्वसन बरोबर इतर प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकार योग्य भूमिका मांडते
मराठा आरक्षण बाबतीत उच्च न्यायालयाने स्थगितीबाबत पुढील तारीख दिली आहे. यावरून आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावरून बोलताना पाटील म्हणाले, राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडत आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकार कुठेही कमी पडले नाही, असे स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेले दोन वकीलही न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी बाजू मांडत आहेत, याशिवाय सरकारने आणखी दोन वकील नियुक्ती केले आहेत, अशा शब्दात टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना पाटील यांनी टोला लगावला आहे. तसेच न्यायालयात हा प्रश्न असल्याने त्याबाबत जास्त भाष्य करणे योग्य होणार नाही, मात्र मराठा समाजाला न्यायालय न्याय देईल, अशी अपेक्षा असल्याचे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
दानवेंच्या वक्तव्याबाबत स्मितहास्य
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे वादग्रस्त केलेल्या वक्तव्याबाबत मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, जयंत पाटील यांनी केवळ स्मितहास्य करत या प्रश्नावर बोलणे टाळले.