सांगली - लसीकरणाबाबत केंद्राकडून योग्य नियोजन झाले असते, तर देशाचे सहा महिन्यात लसीकरण पूर्ण झाले असते, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. तसेच तिसऱ्या लाटेसाठी आता नागरिकांनी जागरूक राहावे लागेल असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
35 नव्या रुग्णवाहिका आरोग्य सेवेत..
सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना 14 व्या वित्त आयोगाचा व्याज निधी आणि शासन निधीतून 35 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य आणि शिक्षण चळवळ बनवू..
याप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्यासेवा बळकट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रही बळकट करण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या 141 शाळा मॉडेल स्कुल बनवण्यात येत असून इंग्रजी शाळांच्या तुलनेत उत्तम सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आरोग्य आणि शिक्षणाची चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात ज्या चार जिल्ह्यात कोरोनाविरोधात काम चांगले झाले आहे, त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
दीड वर्षात आरोग्य यंत्रणा बळकट..
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीनंतर गेल्या दीड वर्षांपासून राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटी करण्यासाठी राज्य सरकार कडून निधी खर्च करण्यात आलेला आहे. तर पहिल्या लाटेनंतर अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले, त्यामुळे दुसरी लाट आली. आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी 70 टक्के लसीकरण आवश्यक आहे. पण तोपर्यंत मास्क, सोशल डिस्टंन्स अशा नियमांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर जुलै महिन्यापासून लसीचे डोस वाढले पाहिजे, तरच आपले जीवनमान सर्वसामान्य होऊ शकते, असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.