सांगली - महायुतीच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये पडली आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा आणि तासगाव याठिकाणी दुध वाहतूक रोखत दूध रस्त्यावर ओतले आहे. यावेळी दुधाचा एक टँकर फोडण्यात आला.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या माध्यमातून आज (शनिवार) १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सांगली जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलना सुरवात केली आहे.
हेही वाचा - 'राज्याची गाडी एक, मात्र स्टेअरिंग दोघांच्या हाती, कुठंपर्यंत जाईल माहिती नाही'
वाळवा तालुक्यातील आष्टा येथील भिलवडी रोडवर एक दुधाची वाहतूक करणारा एक टँकर रोखत त्या टँकरचा व्हॉल्व फोडून टँकरमधील हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले आहे. तसेच तासगाव याठिकाणी तासगाव-कराड रस्त्यावर रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे कॅन वाहतूक करणारी गाडी रोखून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून दिले आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दूध दरवाढीची मागणी करण्यात आली आहे.