सांगली - जिल्ह्यात कोरोनाच्या छायेत आज वटपौर्णिमा साजरी झाली. तोंडाला मास्क बांधून सोशल डिस्टन्स पाळत सुहासिनींनी वटपूजा केली. यावेळी कोरोनामुक्त भारताचे साकडे सुहासिनींनी वटसावित्रीकडे घातले. वटपूजनाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने सुहासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, पतीला दीर्घ आयुष्य लाभावे, यासाठी महिला प्रार्थना करतात.
आज कोरोनाच्या आपत्तीमुळे मंदिर बंद असल्याने महिलांनी वडाची फांदी आणून आपल्या नातेवाईकांसोबत पूजन करत सण साजरा केला आहे, तर कोणी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या वडाचे पूजन केले आहे. मात्र, हे करताना महिलांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शासनाच्या नियमांचे पालनही केले. तसेच कोरोनामुक्त भारतासाठी साकडेही घातले. मात्र, यंदा दरवर्षी वटपूजनासाठी होणारी सुहासीन महिलांची गर्दी आणि तो उत्साह पाहायला मिळाला नाही.