सांगली - 'आमच्या टप्प्यात आला की, आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो', राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा डायलॉग. आणि महापालिकेच्या महापौर निवडणूकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर जयंत पाटलांचा हा डायलॉग जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही या डायलॉगच्या माध्यमातून जोरदार मिम व्हायरल केले आहेत.
टप्प्यात आला,की करेक्ट कार्यक्रम -
राजकारणातील डावपेचासाठी धुरंधर राजकारणी म्हणून जयंत पाटलांचा ओळख आहे. जयंत पाटलांचा "आमच्या टप्प्यात आला,की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो", हा डायलॉग राजकारणात भलताच फेमस आहे. राजकारणातून एखाद्याला रस्ता दाखवण्यासाठी किंवा गेम करण्यासाठी आपसूक राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते जयंत पाटलांच्या डायलॉगचा हमखास दाखला देत असतात, त्यामुळे जयंत पाटलांचा हा डायलॉग राज्यात फेमस आहे.
दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा होती पणाला -
सांगली महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या निमित्ताने हा डायलॉग सध्या चर्चेत आला आहे. सांगली महापालिकेमध्ये गेल्या अडीच वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. 41 अधिक 2 इतकी सदस्य संख्या भाजपाची होती. काँग्रेसची संख्या 19 आणि 15 संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. अशी परिस्थिती असताना देखील सांगली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीमध्ये चमत्कारच झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर याठिकाणी निवडून आला आहे. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते मिळाली आहेत आणि त्याच्या विरोधी उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली आहेत.वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती.
जयंत पाटलांनी केली मोर्चे बांधणी -
तीन मताने या ठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली असली तरी भाजपाची एक-दोन नव्हे तर तब्बल सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीच्या निमित्ताने फोडले, या फोडाफोडीच्या राजकारणात जयंत नितीचा वापर केला गेला. त्यामुळेचंसगळ्यात कमी संख्याबळ असताना बहुमताच्या जोरावर महापौरपदाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात पडली आहे. या खेळीमागे जयंत पाटील यांनी हलवलेली सूत्रे हेच प्रमुख कारण आहे.
चंद्रकांतदादांवर बनवले टीकात्मक मिम्स -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विजयानंतर सांगलीच्या सोशल मीडियावर जयंत पाटलांचा फेमस असणार हा डायलॉग जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळी मिम्स तयार करत व्हायरल केले आहेत. एक प्रकारे भाजपा आणि चंद्रकांत पाटलांवर या मिमच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या राजकीय नीतीची ताकद दाखवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या टप्प्यातील करेक्ट कार्यक्रमाच्या डायलॉगचे क्लिप्स सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवले होते.