सांगली - वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
शिराळा, कापरी, खेड, रेड आदी गावांमध्ये आंबा बागायतदारांचे नुकसान झाले आहे. या आधीही १३ एप्रिलला गारांचा पाऊस पडला होता. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तर, गुरुवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसात कापरी, खेड, इंग्रूळ रिळे या गावांचे नुकसान झाले. रिळे येथील भवाने वस्ती परिसरामध्ये आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात जवळपास पंधरा एकर आंब्यांच्या बागा आहेत.
या वर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, १३ दिवसात दोनदा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. या दोन्ही पावसात ५० एकर आंबा बाग बाधित झाल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱयांनी विमा उतरवलेला नाही. त्यामुळे सरसकट पंचनामे करुन भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.