सांगली - बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून कवठेपिरान येथे एका युवकाचा खून करण्यात आला आहे. ओंकार माने (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. संशयित निखिल सुतार याने हत्या करून स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथे सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती घडली आहे. बहिणीशी लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने ओंकार माने या युवकाचा निर्घृण खून केला आहे. ओंकार याने गावातील निखिल सुतार या तरुणाच्या बहिणीशी पळून जाऊन सहा महिन्यापूर्वी लग्न केलं होतं. याचा राग निखिलच्या मनात धगधगत होता. काही दिवसांपूर्वी ओंकार हा निखिलच्या बहिणीसह गावी परतला होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ओंकार हा गावातील असणाऱ्या चव्हाण वाड्याजवळ थांबला होता. दरम्यान निखिल याने ओंकार याच्यावर हल्ला चढवत धारदार शस्त्रांनी वार करून ओंकारची निर्घृण हत्या केली. त्यानंतर संशयित निखिल याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, खुनाची माहिती दिली आहे. तर या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.