सांगली - गेले 3 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. विशेषतः पलूस आणि वाळवा तालुक्यातील फळे-भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
फळे-भाजीपाला शेतीला मोठा फटका
सांगली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणात फळे-भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः वाळवा आणि पलूस तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीलाही सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अचानक वादळी वारा, गारपीट व अवकाळी पाऊस, अशा दुहेरी अवस्थेत सापडलेला शेतकरी आता मात्र पुरता हवालदिल झाला आहे.
पंचनामे करून भरपाईची मागणी
गारपीटी व वादळी वाऱ्यामुळे पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील केळीच्या अखंड बागा पडल्या आहेत. तर, पपईच्या बागा मुळासकट उखडून जमीनदोस्त झाल्या आहेत. द्राक्ष बागेची व ऊस पिकांची पाने गारपीठीमुळे पूर्ण फाटली आहेत. त्याचबरोबर ढोबळी मिरची व भाजीपाला कुजून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते टाकून द्यावे लागत आहे. तर, वाळवा तालुक्यातही अशीच स्थिती आहे. या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
हेही वाचा - राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस मिळणार मोफत
हेही वाचा - 18 वर्षावरील लाभार्थ्यांना पैसे घेऊन लस, ही तर मुंबईकरांची फसवणूक - भाजपा