सांगली - भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. खडसे यांचे राजकारण आता उतारवयात आहे, असे म्हणत ज्या पक्षाने मोठे केले त्यावर पक्ष सोडताना आरोप करणे संयुक्तिक नाही. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की, अयोग्य हे जनताच ठरवेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीच्या आटपाडीमध्ये बोलत होते.
भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असणाऱ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयावर प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. भाजपने एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय केलेला नाही, तसेच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य की, अयोग्य हे काळ ठरवेल, असे मत व्यक्त केले.
हेही वाचा - आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक, पण मी भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे
ज्या पक्षाने मोठे केले, त्यावर पक्ष सोडताना आरोप करणे संयुक्तिक नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच खडसेंनी पक्षात खच्चीकरण केलेल्या आरोपावर बोलताना खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण आहे, त्यामुळे खच्चीकरण केले की, पक्षाने मोठे केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही, तसेच भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. भाजपचे पहिल्यांदा सरकार आल्यावर महत्त्वाची नऊ खाती खडसे यांच्याकडे होती, त्यांनतर काय झाले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. पण, अन्यायाची फक्त एकच बाजू समोर येत आहे. बाकीच्या बाजू आता पुढे येतील, असे स्पष्ट करत खडसे यांनी पक्षाने गुन्हे दाखल केले, या आरोपावर बोलताना पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे, भाजपची संस्कृती नाही, असेही मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केले.