सांगली - कृष्णेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे धास्तावलेल्या सांगलीकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. कृष्णेचे पाणी आता काही प्रमाणात ओसरू लागले आहे. सांगली शहरात अर्ध्या फूटापेक्षा जास्त पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे भयभीत झालेल्या कृष्णाकाठाच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या चार दिवसांपासून कृष्णा पाणलोट क्षेत्रात पडणारा संततधार पाऊस आणि कोयना धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग त्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. चार दिवसात सांगलीच्या आयर्विन पूलाखाली पाणीपातळी 25 फुटांनी वाढली होती. त्यामुळे मंगळवारी कृष्णेची पातळी 39.1 फुटांवर पोहोचली होती. सांगलीमध्ये कृष्णेची इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे.
गेल्यावर्षी याच महिन्यामध्ये सांगलीत महापूर आला होता व त्यामुळे अतोनात नुकसानही झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून सांगली शहरातील पूर पट्ट्यात असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले होते. कृष्णेची पाणी पातळी 39 फुटांवर गेल्याने पूर पट्ट्यात असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट, साईनाथ कॉलनी, दत्तनगर या ठिकाणी असणाऱ्या शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते तर सुमारे तीनशेहून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले होते.
मिरजेतही कृष्णा नदी पात्राबाहेर पडली होती. त्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये व नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले होते. या ठिकाणी असणाऱ्या अनेक कुटुंबांनी आपल्या जनावरांसह स्थलांतर केले. मात्र, सोमवारपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने मंगळवारी रात्रीपासून कृष्णेची पातळी स्थिर होऊन संथ गतीने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी सांगलीच्या आयर्विन पूलाखाली अर्ध्या फुटाने पाणी कमी झाले आहे तर, मिरजेत दीड फुटांनी उतरली आहे. त्याचबरोबर औदुंबर, भिलवडी, नागठाणे याठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांना आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.