सांगली - जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 24 तासांमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत 15 फुटांनी वाढ झाली आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत ती 35 फुटांवर पोहोचली आहे. तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि संततधार यामुळे पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यालाही बसला आहे. गेल्या पाच दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व छोट्या नद्या, ओढे आणि नाले यांना पूर आलेला आहे. बहुतांश पुराचे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येऊन मिसळत आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांपासून झपाट्याने वाढ झालेली आहे. 20 फुटांवर असणारी पाण्याची पातळी गुरुवारी सायंकाळी पर्यंत 35 फुटांवर जाऊन पोहोचली आहे.
पलूस, कडेगाव आणि त्याबरोबर सांगली आणि जवळपासच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणीही कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे. त्याचबरोबर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळेही पाण्याची पातळी वाढलेली आहे. तसेच पुढील काही दिवस पावसाचा अंदाज आणि कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे इशारा देण्यात आला.