सांगली - कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी जवळपास ५० फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातल्या बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तसेच सांगली इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर मार्ग आणि कर्नाटककडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
पुरामुळे आतापर्यंत नदीकाठच्या सुमारे १० हजारपेक्षा जास्त कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) दाखल झाले आहे. तर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. संततधार पाऊस आणि चांदोलीत कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीचे पाणी पातळी ५० फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याच्या पातळीमध्ये हळुवार वाढ कायम आहे. त्यामुळे हे महापुराचे पाणी आता सांगलीच्या बाजारपेठांमध्ये घुसले आहे.
शहरातल्या मारुती चौक, शिवाजी मंडई आणि टिळक चौक या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. हा संपूर्ण परिसर पुराच्या विळख्यात अडकला आहे. येथील शेकडो दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शहरातील उपनगर असणाऱ्या शामराव नगर भागातही महापुराचे पाणी शिरू लागले आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर दुसर्या बाजूला सांगली-कोल्हापूर मार्गावर अनेक ठिकाणी पुराचे पाणी पोहोचल्यामुळे येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सांगली शहरातल्या आतापर्यंत सुमारे १ हजार कुटुंबांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर असून आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १३ हजारपेक्षा जास्त कुटुंबांचे तर ४ हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या जवळपास अनेक गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे. सुमारे दीडशेपेक्षा जास्त गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले आहे. मिरज तालुक्यातील ढवळी, म्हैसाळ या गावात आता पुराचे पाणी शिरले आहे. तर कर्नाटककडे जाणाऱ्या म्हैसाळ-कागवाड या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सहाशेहून अधिक एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर पूर पातळीत वाढ होत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पूरभागातील महाविद्यालय आणि शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली आणि मिरज येथील महाविद्यालय आणि शाळा बंद आहेत.