सांगली - महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसेना आणि कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर उभे ठाकत आंदोलन केले. शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे, तर कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. सांगलीच्या म्हैसाळ येथील सीमेवर हे आंदोलन करण्यात आले, यावेळी एकमेकांच्या सरकार विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीमुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी होता.
हेही वाचा - थकीत मजुरीसाठी हमाल तोलाईदारांचा बाजार समितीवर हल्लाबोल
बेळगाव सीमा वादातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नेत्यांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकच्या नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. एकाचे वेळी सीमेवर शिवसैनिक आणि कन्नड भाषिक नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - ...म्हणून आयुक्तांनी केले तिघांना निलंबित; तर, दोघांना केले सेवेतून मुक्त
शिवसैनिकांकडून यावेळी तिरडी मोर्चा काढून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. तसेच कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक हद्दीत कर्नाटकच्या नवनिर्माण सेनेच्यावतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर काही अंतरावरून समोरासमोर हे आंदोलन सुरू असल्याने परिसरात दोन्ही राज्याच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. या आंदोलनामुळे कर्नाटक-महाराष्ट्र मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतून कर्नाटककडे जाणारी एसटी वाहतूक मिरज आगारामध्ये रोखून धरण्यात आली होती.