सांगली - अवघ्या 72 तासांमध्ये सांगलीच्या तासगावमध्ये कोविड रुग्णालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये 70 खाटांचे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले. खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने याची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या रुग्णालयात 63 ऑक्सिजन खाटा, 7 आयसीयू खाटा उपलब्ध करण्यात आले आहेत. जसजशी गरज भासेल तशी या ठिकाणची खाटा आणि बाकी व्यवस्था वाढवण्यात येणार असल्याची माहिती उद्घाटनावेळी खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या कोरोना सेंटरमुळे मोठी मदत होईल आणि मिरजमधील कोविड रुग्णालयावरचा ताण कमी होऊन मृत्युचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, असा विश्वास जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईसह इतर ठिकाणाहून 40 व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात यश मिळालेला आहे. त्याचबरोबर मुंबईतून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धतेबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, औद्योगिक पुरवठा बंद करुन रुग्णांसाठी वापरणार ऑक्सिजन
पुण्यात एका पत्रकाराचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब असल्याचे मत जलसंपदामंत्री पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणाऱ्या कारखानदारांची पूर्ण क्षमता वापरून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत आहे. तसेच औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा बंद करुन फक्त रुग्णांच्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या डाॅक्टरवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल