सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने देशाला चुकीच्या दिशेने नेऊन आर्थिक स्थिती बिघडवण्याचे काम केले आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री पाटील यांनी केली. तसेच देशातील पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा पक्षही भाजपाच असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते.
पदवीधर व शिक्षक संयुक्तिक महामेळावा-
पुणे पदवीधर मतदारसंघातील महा विकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा संयुक्तिक महामेळावा सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा पदाधिकारी व पदवीधर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार?
या समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर सडकून टीका केली. ज्या लोकांनी शेतकऱ्यांची पैसे बुडवले, सहकारी साखर कारखाने हे खासगी केले, असे लोक आता या पदवीधरांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला डोस पाजत आहेत. आता हे लोक पदवीधरांचे प्रश्न काय सोडवणार, अशी टीका नाव न घेता भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
बुध्दीभेद आणि अफवा पसरवणे भाजपाचा छंद-
भाजपा आरएसएसचा वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पण आपल्यातील काही तिकडे गेले आहेत. त्यामुळे आपल्या पेक्षा वेगळी पध्दत असणार नाही, असे मत व्यक्त करत भाजपाकडून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत बुद्धीभेद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये बुद्धिभेदाला बळी पडू नये. अफवा पसरवणे हा त्यांचा छंदच आहे, अशी टीकाही मंत्री जयंत पाटलांनी केली आहे.
भाजपाने देशावर चुकीची आर्थिक धोरणे लादली-
आज पदवीधरांच्या समोर प्रश्न अवघड झाले आहेत.कोरोना स्थिती मुळे हे झाले नसून मागच्या जून-जुलै पासून हे सुरू झाले आहे,कारण देशातील सत्तेत असलेल्या भाजपाने चुकीच्या दिशेने धोरण घेतली,त्यामुळे गेल्या 45 वर्षात सगळयात जास्त बेरोजगारी कोणत्या वर्षात निर्माण झाली असेल तर ती मागील वर्षात निर्माण झाली आहे.आणि पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे भाजपा आहे,आणि आर्थिक स्थिती अडचणीत आणण्याचे आणि देशात चुकीचे आर्थिक धोरण स्वीकारनाचे काम भाजपाने केले असल्याचा,आरोपही यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपाकडून खोटा प्रचार-
यावेळी मेळाव्यामध्ये बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली असल्याचा खोटा प्रचार भाजपकडून सुरू आहे. मात्र तसा कोणताही प्रकार झाला नाही. आचार संहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार आहे, सातवा वेतनाबाबत ही भाजप श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटलांना टोला-
आम्ही कधी मतदार संघ बदलला नाही, विद्यार्थी केंद्र बिंदू मानून आम्ही काम करतो, असा टोला मंत्री सामंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. तसेच उच्च शिक्षण खात्यात भाजपा सत्तेत असताना त्यांनी 67 जीआर मागे घेतले. मात्र आपण गेल्या एक वर्षाच्या काळात फक्त 1 जीआर मागे घेतला, तो ही कोरोनाच्या स्थितीमध्ये प्राध्यापक हितासाठी तो निर्णय घेतल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील नव्या संकल्पाची सुरुवात-
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकमताने काम करत आहेत, ही भविष्यातील संकल्पाची सुरुवात आहे. भाजपाकडून बिहार निवडणुकीचे उदाहरण देण्यात येत आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने आता कोणीही काही करू शकत नाही, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या भविष्यातील समीकरणाचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
यापुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही-
सामंत पुढे म्हणाले, इंजिनिअरिंग कॉलेजे प्रवेश देताना दिल्ली मधून नियम आले होते. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेर जावे लागत होते. मात्र महाविकास आघाडीने यामध्ये 45 टक्के आणि 40 टक्के अशी आरक्षण वर्गवारी केली आहे. त्यामुळे आता यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना परराज्यात अभियांत्रिकी शिक्षणासाठी जाण्याची वेळ येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर तो निर्णय जाहीर होईल, असेही स्पष्टीकरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.