सांगली - अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटके, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे प्रकरणी खोलात जाण्याची राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. यासर्वामध्ये परमबीरसिंग यांचे आलेलं पत्र हे एकूण प्रकरण विचलित करण्याचा प्रयत्न असून, आम्ही विचलित होणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, राज्याला गृहमंत्री बदलण्याची गरज पडणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
ते पत्र लक्ष विचलित करणारे..
राज्यात सुरु असलेल्या अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक यांच्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहिलेल्या पत्रामुळे आता वादळ उठले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. या सर्व प्रकरणी जे कोणी संबंधित आहेत, मग ते कितीही मोठे अधिकारी असतील, त्यांचावर कारवाई झाली पाहिजे आणि ती होईल. तसेच या प्रकरणी एनआयएने तपासात सहकार्याची भूमिका घेतली आहे. शिवाय एटीएसचा तपास अधिक गतीमान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आलेले हे (परमबीर यांचे) विधान आहे. हा प्रकार लक्ष विचलित करणारा आहे, मात्र आम्ही विचलित होणार नाही असे पाटील म्हणाले.
हत्या करणाऱ्या पर्यंत NIA पोहचले !
एनआयएने अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला आहे. एनआयए सध्या हिरेन यांच्या खुन्यापर्यंत पोहचले असेलच. राज्य सरकार या तपासात सर्व सहकार्य करत आहे. शिवाय एटीएस, मुंबई आणि ठाणे क्राईम ब्रँच गेल्या 4-5 दिवसांपासून अधिक मेहनत घेत आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही माहिती मिळाली असेल असे पाटील यांनी सांगितले.
गृहमंत्री बदलण्याची शक्यता नाही..!
मुळात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके कोणी ठेवली, ती कोठून आली, नागपुरहुन आले की आणखी कोठून आली तसेच, ती गाडी कोणी ठेवली आणि मनसुख हिरेन यांचे हत्यारे कोण हा मूळ प्रश्न आहे. या मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित होऊ न देता, या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. हे सरकार स्थिर असल्याचे म्हणत, गृहमंत्री बदलण्याच्या शक्यतेचे खंडन जयंत पाटलांनी केले.