सांगली- राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांचा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेळ्या, मेंढ्या, बैल, गाई यांच्यासह दुष्काळग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दुष्काळी भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, अधिक प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्यात, अतिरिक्त चारा उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर पशु खाद्य अधिक प्रमाणात देण्यात यावे या मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेळ्या -मेंढ्यांसह इतर पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा सरकार कडून करण्यात आली नाही. यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावण्याही सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.