सांगली - वाढत्या तापमानामुळे सांगलीकरांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे उन्हापासून थोडाफार दिलासा मिळवण्यासाठी सांगलीकर आता कृष्णा नदीचा आसरा घेत आहेत. शहराच्या वाढत्या तापमानात थंडगार राहण्यासाठी कृष्णा नदीत पोहण्यासाठी बच्चे कंपनीची तर अक्षरशः झुंबड उडत आहे. त्यामुळे कृष्णेचे पात्र फुलून गेले आहे.
शहरात गेल्या ४ दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. त्यामुळे दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक एसी आणि पंख्याखाली बसणे पसंत करत असल्यामुळे रस्ते ओस पडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, तरीही सांगलीकरांना उकाड्यापासून सुटका होणे कठिण बनत आहे. त्यामुळे सांगलीकर थेट कृष्णा नदीचा आसरा घेत आहेत.
सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने बच्चे कंपनीही आपल्या पाल्यांसोबत कृष्णा नदीवर मनसोक्त डुबण्यासाठी पोहचत आहेत. त्यामुळे सांगलीतील कृष्णाकाठ पोहणाऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. नदीच्या गार पाण्यात पोहुन नागरिक उन्हापासून थोड्या प्रमाणात सुटका करून घेत आहेत.