सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंदची कारवाई हाती घेण्यात आली. यामुळे शहरातील बाजारपेठेत व्यापारी, पालिका व पोलीस प्रशासनामध्ये वादावादीचा प्रकार घडला. लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत आपली दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयुक्तांनी अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने चालू ठेवल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - सांगलीत बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच प्रवेश; महापालिका प्रशासनाचा निर्णय
कारवाईसाठी पालिका आणि पोलीस रस्त्यावर
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात आज सायंकाळी सहा नंतर पालिका व पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार दुकाने बंद करण्याची मोहीम सुरू केली. शहरातील बाजारपेठांमध्ये जाऊन पालिका आणि पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यामुळे व्यापारी आणि प्रशासनामध्ये वादावादीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे, काही वेळ बाजारपेठांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवत आपली दुकाने चालू ठेवली व शासनाने नियम बदलून वेळेची अट घालून द्यावी आणि शनिवारी व रविवारी लॉकडाऊनला जरूर पाठिंबा असले, पण पूर्णतः व्यापार बंदला आमचा विरोध असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी स्पष्ट केली.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
दरम्यान सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यापारी व भाजीपाला विक्रेते संघटनांसोबत बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार, तसेच रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला विक्रीवरही बंदी असून, खुल्या भूखंडावर भाजीपाला विक्रीबाबतचे नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट करत उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळून जी इतर दुकाने सुरू राहतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कापडणीस यांनी दिला.
हेही वाचा - सांगलीत कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ, प्रशासन आले अॅक्टिव्ह मोडवर