सांगली- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील २१ पैकी १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यातील ३ पोलिसांचाही समावेश आहे. तर, अजून ४ अहवाल येणे बाकी आहे.
सांगलीच्या चांदणी चौक नजिकच्या रेव्हेन्यू कॉलनीमध्ये मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे ८ मे रोजी समोर आले होते. यानंतर प्रशासनाने कोरोनाबाधित रहात असलेले परिसर सील केले होते. त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे गृह विलगीकरण करण्यात आले होते, तर हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २१ जणांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर ४ अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. तसेच, मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे.
..अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांना झाले होते संक्रमण
कोरोनाबाधित हा मुंबईवरून आल्या नंतर आपल्या घरात आणि बाहेर फिरत होता. याबाबत त्याच्या भावाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत आरोग्य प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी ३ पोलीस हे त्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.