सांगली - कोरोनामुळे अवघ्या 13 तासात एक कुटुंब उद्धवस्त झाल्याची घटना शिराळा तालुक्यातील शिरशीमध्ये घडली आहे. वडील,आई आणि त्यानंतर मुलगा असे एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोनाने कुटुंब उद्धवस्त...
तालुक्यातील डोंगरीभाग असणाऱ्या शिरशी याठिकाणी झिमुर कुटुंब राहते. तर मुलगा सचिन महादेव झिमुर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 15 दिवसांपूर्वी तो मुंबईहून गावी परतला होता. यादरम्यान त्याच्या आईला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मुलाने गावीच राहणे पसंत केले. आईची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वडिलांनाही लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी आई-वडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मात्र वडिलांची प्रकृती पुन्हा बिघडली. यादरम्यान मुलालाही कोरोनाची लागण झाली आणि संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले.
अवघ्या 13 तासात तिघांचा मृत्यू...
दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे 5 वाजता प्रकृती खालावल्याने वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाले त्यावेळी मुलगा आणि आई दोघेही व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. त्यामुळे नातेवाईकांनीच वडिलांचा अंत्यविधी पार पाडला. हा अंत्यविधी आटपून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आईचा मृत्यू झाला. या मृत्यूची बातमी नातेवाईकांपर्यंत पोहचायची, तोपर्यंत अवघ्या 1 तासाने मुलाचाही मृत्यू झाला आणि कोरोनाच्या घाल्याने एक कुटुंबच संपून गेले. अवघ्या 13 तासात वडील महादेव झिमुर (वय, 75), आई सुशील झिमुर (वय 66) आणि मुलगा सचिन झिमुर (वय 30) अशा तिघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.