सांगली - सर्वांप्रमाणेच सांगली संस्थानच्या गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन झाले आहे. शाही मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन करण्याची गणपती पंचायतन संस्थानची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा खंडित होऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे.
शाही मिरवणूकीला फाटा देत साध्या पद्धतीने सांगली संस्थांनच्या बाप्पांना देण्यात आला निरोप यंदा कोरोनामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपती पंचायतन ट्रस्टचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी भव्य-दिव्य पद्धतीने आणि शाही मिरवणुकीने याठिकाणी गणेशाचे आगमन आणि विसर्जन करण्याची परंपरा आहे. पाच दिवस याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. त्यानंतर शाही मिरवणुकीने पंचायतन संस्थानच्या गणेश बाप्पांचे जल्लोषात विसर्जन करण्यात येते. या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशे, बँड, नृत्य लेझीम, झांज पथक, विविध वाद्य, उंट-घोडे यांचा समावेश असतो. जिल्ह्यातील हजारो भाविक पटवर्धन संस्थांच्या या विसर्जन मिरवणुकीला आवर्जून उपस्थिती लावत असतात. त्यामुळे संपूर्ण सांगली शहर या मिरवणुकीमुळे गजबजून जाते.
मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणपती पंचायतन संस्थांनी मिरवणूक रद्द करत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. पाचव्या दिवशी विजयसिंह राजे पटवर्धन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. त्यानंतर गाडीमधून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठी असलेल्या सरकारी घाट या ठिकाणी गणपतीचा विसर्जन करण्यात आले आहे.
हेही वाचा - सांगली पोलिसांची बालगुन्हेगारांसाठी नवी 'दिशा'