सांगली - सुगंधी तंबाखूचा अवैधरित्या साठा करणाऱ्यांवर सांगली अन्न औषध प्रशासन आणि मिरज पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. तसेच १२ लाखांच्या सुगंधी तंबाखूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा... कोरोनाचा 'स्मार्टफोन'ला विळखा; देशातील उद्योगावर परिणाम होण्याची भीती
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बेळंकी येथे पोलिसांनी छापा टाकत तंबाखूचा साठा जप्त केला. गावातील अमोल गायकवाड याच्या घरात सुगंधी तंबाखु असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. त्यानुसार अन्न औषध प्रशासन आणि मिरज पोलिसांनी गायकवाड याच्या घरी मंगळवारी रात्री छापा मारला. यावेळी घराशेजारी असणाऱ्या एका गाडीमध्ये सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला आहे.
यामध्ये 11 लाख 98 हजाराचा सुगंधी तंबाखूचा साठा सापडला आहे. यानंतर पोलिसांनी तंबाखूसाठ्यासह गाडी जप्त केली. तसेच अमोल तानाजी गायकवाड (38 रा. बेळंकी) आणि सुनील विलास चव्हाण (40 रा. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक केली आहे.