सांगली - अवैध गुटखा वाहून नेणाऱ्या ट्रकला पकडण्यात मिरज पोलिसांना यश आले आहे. ट्रक कर्नाटकातून आला असून तो मिरज तालुक्यातील बेडग मार्गे प्रवास करत होता. यादरम्यान पोलिसांनी ट्रकला मार्गावरच रोखले व तपास केले असता त्यात मोठा गुटखा साठा आढळला. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मिरज पोलीस उपअधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या पथकाने ट्रक कंटेनर थांबवून तपासणी केली असता त्यात अवैध गुटखा आणि गुटखा बनवण्याचे साहित्य आढळून आले. यामध्ये सुगंधी तंबाखू, गुटखा, असे तब्बल 2 कोटींच्या आसपास मुद्देमाल होता, तो पोलिसांनी जप्त केला असून हा सर्व माल मिरजेला जात असल्याची माहिती मिळाली. या कारवाई वेळी कंटेनरच्या मागे पुढे असणारी छोटी वाहने पसार झाली होती. कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खुलेआमपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आजपासून सांगली जिल्हात 8 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा अवैध गुटखा कोणाकडून आला व कोणाकडे पोहोचणार होता याबाबत तपास सुरू केला आहे.