सांगली - पंढरपूरच्या वारीवरून सुरू असलेल्या वादात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील आता उडी घेतली आहे. पंढरपूरच्या वारीवर घालण्यात आलेली बंदी आणि वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना केलेल्या स्थानबद्धतेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'कोरोनाला ठार मारण्याची हिंमत निर्माण करण्यासाठी पंढरीची वारी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'कोरोनाला ठार करण्यासाठी वारीला परवानगी द्या' -
कोरोनाला ठार मारण्याची हिंमत आणि क्षमता निर्माण करायची असेल तर पंढरपूरची वारी झाली पाहिजे आणि त्याला पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली आहे. तसेच 'वारीवर बंदी म्हणजे भारता माता व हिंदू धर्मावर अन्याय असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यासोबतच हा शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या परंपरेवर केलेला आघात आहे, अशी टीकाही संभाजी भिडे यांनी केली आहे.
'बंडा तात्यांची सुटका करा' -
बंडातात्या कराडकर यांना करण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या कारवाईवरुन भिडे यांनी सरकारवर टीका केली आहे. 'बंडातात्या कराडकर हे केवळ वारकरी नसून ते शिवछत्रपती संभाजी महाराज, ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारासाठी अहोरात्र जीवन जगणारे एक वीर वारकरी बंधू आहेत. त्यांच्यावर झालेला कारवाई अन्यायकारक आहे आणि हा अन्याय केवळ त्यांच्यावर नसून समस्त हिंदू समाजाच्या अंतकरणावर झालेला अत्याचार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे सरकारने बंडातात्यांना तत्काळ सोडले पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आणि विठ्ठलाची आज्ञा असल्याचेही ते म्हणाले.
आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात -
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे, ते पालखी सोहळे एसटी बसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी आणि भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.