सांगली - अंगणवाडी सेविकेने आपल्या पोस्टमन पतीसह किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना वाळवा तालुक्यात घडली आहे. शहनाज आत्तार (४४) आणि अल्लाउद्दीन करिम आत्तार (४८) असे आत्महत्या केलेल्या सरकारी नोकरदार दाम्पत्यांचे नाव आहे. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
शहनाज या वाळवा येथील अंगणवाडी क्रमांक ३१६ मध्ये सेविका म्हणून कार्यरत होत्या. तर अल्लाउद्दीन आत्तार हे इस्लामपूर येथील पोस्ट खात्यात नोकरीला होते. मंगळवारी रात्री त्यांनी जेवण करून मधल्या खोलीत अंथरूण टाकले. तिथेच त्यांनी किटकनाशक प्राशन केले. सकाळी शेजाऱ्यांना शंका आल्यानंतर काहींनी हाका मारल्या. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून काही शेजाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. तेव्हा दोघांच्या तोंडाला फेस आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी तातडीने भेट दिली.
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने वाळव्यात खळबळ उडाली आहे. शहनाज या अतिशय उत्साही अंगणवाडी सेविका म्हणून परिचित होत्या. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.