सांगली - शिराळा तालुक्यातील निगडी येथे आलेल्या दोघा पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघे पती-पत्नी मुंबईहून आपल्या गावी परतले होते. मात्र त्यांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. आज दोघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे सांगली शहरातील मुंबईहून परतलेल्या कोरोनाबाधीत आज कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या 18 झाली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे.आणि गेल्या २ आठवडया पासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मुंबई आणि गुजरातहून आलेल्या व्यक्तींमुळे हे रुग्ण संख्या वाढत आहे. आज मुंबईहून आलेल्या दोघा पती-पत्नींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. मूळचे शिराळा तालुक्यातील निगडी येथील हे दोघे पती-पत्नी आहेत. 14 मे रोजी ते मुंबईहून शिराळ्याच्या निगडी येथे आपल्या गावी परतत होते. मात्र, प्रशासनाने त्यांना वाळव्याच्या जांभूळवाडी मध्ये इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. तर त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या.
रविवारी या दोघांचे रिपोर्ट हे कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर दोघांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच कोरोना बाधितांच्या बरोबर त्याठिकाणी राहत असलेल्या अन्य तिघांना ही खबरदारी म्हणून, मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या बाजूला सांगली शहरातील कोरोनाबाधित रुग्ण हा आज कोरोना मुक्त झाला आहे. शहरातील चांदणी चौक नजीकच्या रेव्हेन्यू कॉलनीमध्ये संबंधीत व्यक्ती मुंबईहून आला होता. त्यानंतर 8 मे रोजी प्रशासनाने त्याची चाचणी घेतली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली असता, दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईहून परतलेला तो कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना मुक्त झाला आहे.
एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच बरोबर कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना मुक्त सुद्धा होत आहेत. सध्या दोन रुग्ण वाढल्याने आणि एक कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा १८ झाला आहे.