जत(सांगली)- जत तालुक्यातील प्रतापपूर येथे एका झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली. या दरम्यान लागलेल्या आगीत झोपडी आणि एक दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लता गुलाब मोटे यांच्या झोपडीत ही सिलिंडरचा स्फोटाची घटना घडली.
या गॅस सिलिंडरच्या स्फोटात झोपडी पुर्णपणे जळाले आहे. यामध्ये एकूण 2,50,000/- रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, लता गुलाब मोटे या प्रतापपूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका झोपडीत एकट्याच राहत होत्या. रविवारी सकाळी त्या सकाळी काही कामानिमित्त धावडवाडी येथे गेल्या होत्या. तर शेजारीच राहणारा त्यांचा मुलगा प्रकाश मोटे हे महमदहुसेन अकबर शेख यांच्या रानात गेला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लता मोटे यांच्या झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीत संपूर्ण झोपडी आणि तेथील एक दुचाकी जळून खाक झाली. गणेश बाळु वाघमोडे यानेया घटनेची माहिती लता मोटे यांचा मुलगा प्रकाशला सांगितली.