शिराळा (सांगली) - तालुक्यातील इनामवाडी येथील प्रकाश नामदेव चव्हाण व विकास नामदेव चव्हाण यांच्या घर व जनावरांच्या शेडला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, प्रकाश नामदेव चव्हाण व विकास नामदेव चव्हाण यांचे तीन आखणीचे घर आहे. त्यास लागून जनावरांचे शेड असून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने घराला आग लागली, तर शेडमध्ये गवत असल्याने आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले, धुराचे लोट वाहू लागले. आग लागल्याचे दिसताच घरातील लोकांनी आरडाओरडा केला. त्यावेळी वाडीतील संदीप चव्हाण, नागेश चव्हाण, जोती चौगुले, प्रकाश पाटील, हरेश चौगुले, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, संजय पाटील, राहुल चौगुले, सौरभ चौगुले, सचिन पाटील, संजय घोडवील या तरुणांनी आणि महिलांनी एकत्रित येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
आग विझवण्यासाठी पाणी नसल्याने लोकांनी आपापल्या घरात साठवून ठेवलेले पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. विद्युत पंपाची लाईट नसल्याने विद्युत मोटार सुरू करता आले नाही. वाडीतील घरातील पाणी संपल्याने निनाईदेवी साखर कारखान्याच्या टँकरने पाणी आणून दोन तासांच्या अथक प्रत्यनाने आग आटोक्यात आणली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर आजूबाजूला घरे होती, तिही आगीच्या भक्ष्यस्थानी आली असती. आगीत कौले, रिपा, वासे, गवत, धान्य जाळून खाक झाले असून पत्र्याचेही नुकसान झाले आहे. प्रकाश यांचे ४९ हजार ०५० व विकास यांचे ५१ हजार ८२५ असे एकूण १ लाख ८७५ रुपये नुकसान झाले आहे. तलाठी मोहन शिरसे, उपसरपंच सदाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बडडे, विश्वजित पोतदार, विश्वनाथ देशपांडे यांनी पंचनामा केला.