सांगली - जिल्ह्यातील कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 21 गावांचा समावेश असल्याने या आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. शिवाय सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असताना केंद्रामध्ये डॉक्टरसह कर्मचारी नसल्याने दुपारनंतर चक्क रुग्णालयच बंद होते. यामुळे, कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आरोग्य केंद्र हे काही ना काही कारणाने वादग्रस्त ठरले आहे. गेल्या ४ महिन्यांपूर्वी इंजेक्शनसाठी 30 रूपये घेतल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे यांच्यावर कारवाई करत त्यांच्या जागी नवनाथ चौगुले यांची नेमणूक करण्यात आली. चिवटे हे कुरळप आरोग्य केंद्रात गेली १० ते १२ वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळामध्येही सलाईनसाठी पैसे घेणे, कुत्रा चावलेल्या लसीचे सुद्धा पैसे घेतले जाण्यासारखे प्रकार होत असल्यानेही रुग्णांमध्ये नाराजी होती. परंतु, सध्या त्यांच्या जागी आलेल्या वैदकीय अधिकारी चौगुले यांच्यामुळे काहीतरी फरक पडेल असे वाटत असताना कर्मचाऱ्याविना रुग्णालयच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर, पर्यायाने रुग्णांना खासगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. सध्या खासगी दवाखाण्याचा खर्च परवडणारा नसल्याने शासकीय दवाखाना हे सर्वसासाम्यांसाठी एक प्रकारे दुवा म्हणून काम करते. पण हाच दुवा कर्मचाऱ्यामुळे बंद राहिला तर काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री करा, मंत्रीपदाच्या शपथ सोहळ्या निमित्ताने इस्लापुरात समर्थकांची मागणी
सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असून बाहेरून कामाकरता मजूर आलेले आहेत. यातील काही ऊस तोड मजूर आजारी पडल्याने ते रुग्णालयात आले असता तिथे कोणीच नव्हते. वैद्यकीय अधिकारी चौगुले हे २ दिवसांपासून प्रशिक्षण असल्याने त्यांनी बदली अधिकारी दिला असल्याचे सांगितले. मग, २ दिवसांपासून बदली डॉक्टर व बाकीचे कर्मचारी गेले कुठे आणि त्यांच्यावर कोणाचेही बंधन नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
गेल्या ६-७ वर्षांपासून आरोग्य केंद्रामध्ये शिपायाची ४ पदे रिक्त आहेत. सध्या येथे एकच शिपाई असून तो ही रात्रीच्या वेळेस असतो. तर, २ महिला सुपरवायझर असून १ आरोग्य सेविका आहे. शिवाय २ वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे असताना सध्या एकच अधिकारी उपलब्ध आहेत. तर, १ औषध निर्माण अधिकारी आहेत. हे सर्व असताना रुग्णालय दुपारनंतर बंद का ठेवले जाते. यामुळे २ दिवस ऊस तोड मजूर रुग्ण व शासकीय कर्मचारी तंदुरुस्ती पत्रासाठी (फिटनेस सर्टिफिकेट) आले असता दवाखान्यात कोणीच नसल्याने ते दिवसभर रुग्णालयात बसून होते. तर, कुरळप येथे पोलीस ठाणे असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करावी लागते.
परंतु, ५ नंतर डॉक्टर नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जावे लागते आहे. शिवाय मृत व्यक्तीचे शवविच्छेदनाचा अहवाल देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची असताना ते बाहेरगावी खासगी रुग्णालयात नातेवाईक व पोलिसांना पाठवतात. यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृतदेह वेळेवर मिळत नसल्याने नातेवाईक व पोलीस यांच्यात अनेक वेळेस वाद झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा कुरळप आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा - अखेर उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्याला दिलेला 'तो' शब्द पाळला