सांगली - हिवरे महिला तिहेरी हत्याकांडप्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने दोघांना आजन्म कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आज (मंगळवारी) झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये न्यायालयाने सुधीर सदाशिव घोरपडे आणि रवींद्र रामचंद्र कदम या दोन आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्याचे काम पाहिले.
हेही वाचा - बदनापूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली एकाच कुटुंबातील 3 महिलांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आज या खून खटल्यात दोघा आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अजन्म करावासाची शिक्षा सुनावली. आरोपी सुधीर घोरपडे याच्या बहिणीचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरी तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या माहेरकडून होत होता. त्यातच तिने आत्महत्या केली होती. तिच्या नातेवाईकांकडून आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांकडूनच तिचा घातपात झाल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते.
सुधीर घोरपडे याने साथीदार रवींद्र कदमच्या मदतीने आपल्या बहिणीच्या घातपात केल्याचा बदला म्हणून शिंदे कुटुंबीयांच्या घरावर 21 जून 2015 ला हल्ला केला. यात घरातील सदस्य प्रभावती शिंदे, निशिगंधा शिंदे आणि सुनीता पाटील यांचा चाकूने गळा कापून हत्या केली होती. खटल्यामध्ये 21 साक्षीदारांचा जबाब घेतला गेला व महत्त्वपूर्ण म्हणजे बारा वर्षाच्या एका मुलाच्या साक्षीवरुन आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले.
हेही वाचा - अश्लील हावभाव करत बारबालांचे नृत्य, अंगावर नोटांचा पाऊस अन्...