सांगली - शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. तर, मिरज पूर्व भागात जोरदार गारपीट झाली आहे. सकाळपासून उन्हाचा कडाका होता. मात्र, दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण झाले आणि सायंकाळच्या सुमारास विजाच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पावसाला सुरवात झाली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर दुसऱ्या बाजूला मिरज तालुक्यातील पूर्व भागातील शिपूर, एरंडोली, पाय्यापाचीवाडी आणि बेळंकीसह परिसर आणि भोसे या ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे.
बागांचे नुकसान, शेतकरी हवालदिल
या गारांसह झालेल्या आवकळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे द्राक्षांच्या पानांना आणि कांड्याना मार बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोमवारी वीज पडून गाय, म्हशीचा मृत्यू
सोमवारी (26 एप्रिल) झालेल्या विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हैसीवर वीज पडून मृत्यू झाला. त्यात 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांच्या गाईचा मृत्यू झाला. यात शिवाप्पा यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांच्या देखील गाईचा मृत्यू झाल्याने 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. गोंधळेवाडी, जाडरबोबलाद, लकडेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे, लकडेवाडीचे नितीन कुंभार, राजेश चाचे, गणेश पवार, राहूल कोळी यांनी पंचनामा केला.
हेही वाचा - पुण्यात स्कूल बसचा वापर रुग्णवाहिका म्हणून
हेही वाचा - बारामतीत 'कलरफुल' कलिंगडांची चलती; सहा एकर क्षेत्रात १२० टन उत्पादन