सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी हज कमिटीची शिबिरे तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली. तसेच हज यात्रा रद्द होणार नसून १० जून रोजी महाराष्ट्रातून पहिले विमान हजसाठी रवाना होणार आहे. तोपर्यंत सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीच्या खिदमत हुज्जाज कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन करण्याता आले होते. या बैठकीत त्यांनी सदर माहिती दिली. राज्यातून हज २०२० साठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आजपासून हज कमिटीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रशिक्षण शिबिरे रद्द करण्यात आल्याची माहिती आज हज कमिटीचे अध्यक्ष हाजी जमाल सिद्दिकी यांनी दिली आहे. सर्व यात्रेकरूंना आम्ही ऑनलाइन पद्धतीने माहिती देण्याचे काम सुरू केले आहे, तसेच यंदाची हज यात्रा रद्द होणार अशा अफवा पसरवल्या जात आहे. पण, तूर्तास उमराह ही यात्रा रद्द केली आहे, मात्र हज यात्रा अजून रद्द केली नसल्याचे सिद्दिकी यांनी सांगितले.
हज यात्रा वेळेत पूर्ण होईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सौदीच्या सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे, मात्र सौदी सरकारने यात्रेबाबत अजून कुठल्याही सुचना दिलेल्या नाहीत. तसेच १० जून रोजी महाराष्ट्रातून पहिले विमान हज यात्रेसाठी रवाना होणार असून तोपर्यंत सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास जमाल सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसवर निशाणा साधत, अजूनही आमचे स्वतःचे हज ऑफिस नाही. आम्ही आमच्या इमारतीत झेंडावंदन करू शकत नाही. कारण हज यात्रेकरूंसाठी काँग्रेसने काहीच केलेले नाही. त्याचबरोबर आम्ही एनआरसी आणि सीएएचे समर्थन करत आहोत. मात्र, मुस्लिम समाजाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भडकवण्याचे काम सुरू आहे. मुस्लिमांना सुविधांपासून वंचित ठेवण्यासाठी काही लोक काम करत असल्याचा आरोप यावेळी जमाल सिद्दिकी यांनी केला आहे.
हेही वाचा- कोरोना इफेक्ट : फुकट घ्या फुकट, कोंबड्या फुकट; मिरजेत चक्क कोंबड्या वाटल्या मोफत