सांगली - जिम व्यवसायाला परवानगी द्या, नसेल तर जिममध्ये दारू विक्रीला तरी परवानगी द्या, अशी अनोखी मागणी सांगलीतील व्यावसायिकांनी केली आहे. यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चक्क रस्त्यावर व्यायाम करत मिरज भाजपाच्यावतीने जिम व्यवसायिकांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात जवळपास जीवनमान पूर्वपदावर येत आहे. असे असताना जिम व्यवसायावर मात्र सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यासह देशातील जिम व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे जिम व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट्स, दारू अशा सर्व गोष्टींना सरकारने परवानगी दिली आहे. तर कोणाच्या संकटामध्ये प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्यायामाची गरज असताना या व्यायामावर मात्र सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत ही चुकीची बाबा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आज (शुक्रवारी) जिम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी शहरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर शरीरसौष्ठवपटूंनी हातात डंबेल्स घेऊन, जोर-बैठका मारून व्यायाम करत आंदोलन केले.