सांगली - कोकणात आलेले केंद्राचे पथक मासे खाण्यासाठी आले होते का, पाहणीसाठी?, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय पथकच्या पाहणी दौऱ्यावर केली आहे. महाराष्ट्र सरकारने जे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. ते गृहीत धरून केंद्राने मदत दिली पाहिजे, अशी मागणीही मंत्री उदय सामंतांनी केली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय पथक पाहणीसाठी की? मासे खाण्यासाठी ? -
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याठिकाणी त्तौक्ते आलेल्या चक्रीवादळानंतर तब्बल 22 दिवसांनी केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे. रविवारी केंद्राच्या पथकाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणी दरम्यान पथकाकडून देवदर्शन करत जेवणावर ताव मारत माशांचा आस्वाद घेण्यात आल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याचा आधार देत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर टीका केली. 22 दिवसांनी हे पथक येऊन पाहणी करत आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. आता आमच्याकडे समुद्राचे मासे मिळत नाहीत, नदीतील मासे मिळतात, मग हे पथक पाहणीसाठी आले होते का? का मासे खाण्यासाठी आले होते? असा टीकात्मक सवाल उपस्थित केला आहे.
राज्याच्या पंचनाम्याच्या आधारावर केंद्राने मदत करावी -
कोकणात जे संकट आले होते, त्यातून आता कोकण सावरत आहे, यामागे महाविकास आघाडी सरकार आहे. कोकणातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर म्हणून उद्धव ठाकरेंनी 252 कोटी रुपयांची मदत केली आहे. आता बावीस दिवसानंतर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा नुकसान केंद्रीय पथकाला दिसणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे पंचनामे गृहीत धरून ज्या पद्धतीने राज्य सरकारने 252 कोटी रुपयांची मदतिचे पाऊल टाकले आहे, त्यापद्धतीने मदत देण्याबाबतीत पाऊल टाकावे, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.