सांगली - लांबलेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रोगाचा प्रदुर्भाव झाल्याने द्राक्षे पाण्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय मधुकर काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, औषध फवारणीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.
सततच्या पावसाने द्राक्षबागांना रोगराईचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव तसेच जत व आटपाडी तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मणी गळून पडले. तर, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये दावण्या आणि मेलिड्यु नामक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांमुळे रोगांवर नियंत्रण मिळवणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांच्या हतबलतेमध्ये वाढ झाली आहे. शासनाकडून पंचनामे करण्यात आले असले, तरीही मदत मिळण्याबाबत संदिग्घता कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
याच प्रकारची परिस्थिती जिल्ह्यातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची असून, सरकारकडून वेळीच मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याव्यतिरीक्त कोणताही पर्याय समोर नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.