सांगली - लॉकडाऊनमधील अडचणींचा विचार करून शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानातून जनतेला वितरित करण्यात येत असलेली मोफत हरभरा डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या डाळीच्या सेवनाने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सांगली ऐतवडे बुद्रुक ता. वाळवा येथील स्वस्त धान्य दुकानातून ही डाळ वितरित करण्यात आली आहे.
शासनाविरोधात जनतेचा रोष
स्वस्त धान्य दुकानातून वितरित केलेली डाळ दक्षता समितीच्या निदर्शनास शिधापत्रिकाधारकांनी आणून दिली. ही डाळ निकृष्ट असून गुरांना टाकण्याजोगी आहे. डाळीचा दर्जा खालावलेला असताना त्यात किडलेल्या डाळीचे प्रमाण तसेच खड्यांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली असून जनतेकडून शासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. शासनाच्या मोफत धान्य वितरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डाळीचे वितरण केले जात आहे. याचा आम्हाला पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या डाळींचे वितरण होत असून आदेशाप्रमाणे आम्हाला वाटप करणे बंधनकारक आहे, असे धान्य दुकानदारांनी सांगितले.
ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींकडे तक्रार
स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट डाळीचे मोफत वाटप होत असल्याने गावातील शिधापत्रिकाधारकांना ही डाळ वाटप करण्यात आली. शिधापत्रिकाधारकांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे तक्रार केली, तसेच दक्षता कमिटीने याची पाहणी केली. तात्काळ निकृष्ट स्वस्त धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटू नका, असे सांगून तसे दक्षता कमिटीने त्यांना लेखी पत्र दिले आहे.
हेही वाचा - कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकच्या हजारो किटचे पॅकिंग घरातच, व्हिडिओ व्हायरल