सांगली - जिल्ह्यात मंगळवारी आणखी ४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा १८२ झाला आहे. यातील १०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली आहे.
मंगळवारी कोरोना लागण झालेल्यांमध्ये आटपाडीच्या निंबवडे येथील ५८ वर्षीय व्यक्ती आणि ६५ वर्षीय महिला, शिराळ्याच्या किनरेवाडी येथील ३५ वर्षीय तरुण आणि कडेगावच्या विहापूर येथील ८२ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित रुग्णांची गावे सील करुन त्याठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेले पाच रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ४५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, रिळे येथील ४८ वर्षीय पुरुष, आष्टा येथील ३२ वर्षीय तरुण आणि आटपाडीच्या शेटफळे येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.