सांगली- सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे.बुधवारी आणखी चार रुग्णांची भर पडली आहे.मिरज शहरातील एक आणि सांगली शहरातील ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीतील एका माजी नगरसेविकेच्या मुलाचा अहवाल खाजगी लॅब मध्ये पॉझिटिव्ह आला आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे पालिका क्षेत्रात प्रादुर्भाव वाढत आहे,नागरिकांकडून माहिती लपवण्यात येत असल्याने हा धोका वाढत, असल्याचे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली ,मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.बुधवारी यामध्ये आणखी ४ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये १०० फुटी रोडवरील एका हॉस्पिटलशी संबधित आणखी एक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना यापूर्वीच इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. सांगलीच्या रमामाता नगर,काळे प्लॉट येथे राहणारी आणि वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
गावभाग नजीकच्या सिद्धार्थ परिसर मधील रोहिदासनगर येथील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.ही महिला याच परिसरात घरोघरी फिरून आपली गुजराण करीत होती. त्यामुळे या ठिकाणी मोठा कंटेंनमेंट झोन केला जाणार आहे. मिरजेच्या पंढरपूर रोडवर राहणाऱ्या आणि एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत सेवा बजावणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.त्याच बरोबर सांगलीतील वारणाली येथील एका माजी नगरसेविकेच्या मुलाचा खाजगी लॅब मध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर मुलगा हा गुजरातमधून प्रवास करून आल्याची माहिती आहे,प्रशासनाने त्याचा स्वॅब शासकीय लॅब मध्ये पाठवण्यात आला आहे.
खबरदारी म्हणून या सर्व ठिकाणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेटी देत आरोग्य यंत्रणेला खबरदारीच्या सूचना दिल्या.तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. सांगली मनपा क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अर्ध शतक पूर्ण केले आहे.त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती आणि किरकोळ आजार असणाऱ्या लोकांची माहिती लपवली जात असल्याचे निदर्शनास येत असून कोणत्याही नागरिकांनी माहिती लपवू नये,असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.