सांगली - आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला धडा शिकवता येत नाही, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊत हे बिनकामाचे आहेत, असा टोलाही निलेश यांनी लगावला आहे. इस्लामपूरच्या पेठ नाका येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
सत्तेतील तिन्ही पक्ष लबाड
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल माळी यांच्यावतीने पेठ नाका या ठिकाणी महाडिक शैक्षणिक संकुलामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने भाजप कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निलेश राणे म्हणाले, महाराष्ट्रमध्ये तिघांचे सरकार आहे आणि तिघेही लबाड आहेत. या तीन लबाड पक्षांना भाजपला सामोरे जायचे आहे.
शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी आक्रमक व्हा
तसेच आक्रमक झाल्या शिवाय शिवसेनेला धडा देऊ शकत नाही. आम्ही त्यांना आतून-बाहेरून चांगले ओळखतो आमचा अर्धा वेळ मातोश्रीवर जायचा, त्यामुळे त्यांना हीच भाषा कळते, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली.
सरकार काहीच काम करत नाही, त्यांची 'पीआर एजन्सी' काम करते
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर ही निशाणा साधत निलेश राणे म्हणाले, संजय राऊत रोज उठून जॅकेट घालून सकाळी बसतात, तेच पत्रकार, तेच दांडा त्यांना दुसरे कामच नाही. हे सरकार काही काम करत नाही, त्यांची पीआर एजन्सी काम करते, अशी टीका संजय राऊत वर राणे यांनी केली.
हेही वाचा - आघाडी सरकारकडून राज्याचा बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग - चंद्रकांत पाटील