सांगली - कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 तीन जिल्ह्यात आलेल्या महापुराचा सरकारकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाकडे हा अहवाल तयार करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या १० दिवसात या महापुराच्या कारणांचा आणि उपाययोजनांचा अहवाल तयार करून सरकारकडे सादर होणार आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सातारा या ३ जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुराच्या कारणांचा शोध सरकारकडून घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या उद्भवलेल्या महापुराच्या बाबतीत नेमके कारण काय, यंत्रणेचा दोष आहे का? या पुराला आणखी कोण जबाबदार आहे का? अशा सर्व पातळ्यांवर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाटबंधारे विभागाकडे हा अहवाल तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या विभागाकडून या तीनही जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या कुंडल्या तयार करण्यात येणार आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस त्याचबरोबर अलमट्टी धरणातून सोडण्यात आलेले पाणी, अलमट्टी धरणाचा विसर्ग तसेच सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात नाल्यावर झालेल्या अतिक्रमण अशा सर्व बाबींचा अभ्यास पाटबंधारे विभागाकडून होणार आहे. हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान आलेला महापुराला नेमकी कोणती कारणे कारणीभूत होती. हे तांत्रिकदृष्ट्या नमूद होणार आहे. महापुराच्या बाबतीत नेमक्या काय उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात येणार आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये राज्य सरकारकडे हा अहवाल सादर होणार आहे.