सांगली- इस्लामपूरमध्ये एका मासे विक्रेत्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथील मायक्का मंदिरापाठीमागील उरूणवाडी रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारासही घटना घडली. अक्षय अशोक भोसले (वय २८ रा. उरुणवाडी ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक देवान-घेवानीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अक्षय भोसले यांचे इस्लामपुरात मासे विक्रीचे दुकान आहे. बुधवारी ३ ग्राहक त्याच्याकडून कोळंबी उधारीने खरेदी केली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पुन्हा तेच तिघे मासे खरेदी करायला त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी अक्षयने त्यांच्याकडे बुधवारच्या उदारीची मागणी केली. मात्र, त्या पैशावरून अक्षय आणि त्या ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाला. ते तिघेही अक्षयचे मित्र असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
मामाने फोनवरून ऐकला जिवाचा आकांत-
गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर अक्षय मासे विक्रीचे काम संपवून दुचाकीवरून (एमच १०–डीएच ९५२७) वरून घराकडे निघाला होता. आंबेडकर नाका येथून येडेनिपाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उरूणवाडी जवळच्या ओढ्याजवळ येऊन त्याने मामा किरण पवेकर यांना फोन लावला. मामाशी फोनवर बोलत तो माशांची ऑर्डर देत होता. याचवेळी अज्ञातांनी अक्षय वर खुनी हल्ला चढवला. तेव्हा जिवाच्या आकांताने ओरडत तो पळत सुटला. हा सर्व प्रकार अक्षयचा मामा फोनवर ऐकत होता. त्यानंतर अज्ञातांनी अक्षयची निर्घृणपणे हत्या केली. अक्षयचा मामा घटनास्थळी पोहोचे पर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केला होता व्यवसाय-
अक्षयचा मामा पवेकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी अक्षयचा मामा घटनास्थळी दाखल झाला होता. अक्षय भोसले हा मुंबईत भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता. त्यानंतर गावी येऊन तो भाजीविक्रीचा व्यवसाय करू लागला होता. त्यानंतर मामा पवेकर यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याला मासे विक्रीचे दुकान सुरू करून दिले होते. तसेच मार्च महिन्यातच अक्षयचे पवेकर यांच्या पुतनीसोबत लग्न झाले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची गुरुवारी हत्या झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे, मामाने सांगितल्या प्रमाणे गुरुवारी दुपारी झालेल्या वादातूनही हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.