सांगली - गेल्या तीन दिवसापासून शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पेठ येथील तीळगंगा नदीला पूर आला असून येथे तयार केलेला टायर बंधारा भरून वाहत आहे. आनंदवन सामाजिक अभियान व उगम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी बाबा आमटे स्मृती टायर बंधारा बांधण्यात आला. केवळ साडेसहा लाख रुपयात निरोपयोगी टायरचा वापर करून हा बंधारा बांधण्यात आला आहे. पन्नास लाख लिटर पाणी साठवण्याची याची क्षमता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
महारोगी सेवा समिती, संपतराव पवार, श्री. दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर, तत्कालिन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, नीळकंठ मांगलेकर, नितीन वारवडे यांच्या सह अनेकांनी यासाठी आर्थिक मदत केली होती. या बंधाऱयामुळे परिसरातील शंभर एकरावरील पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, वारणा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. शिराळा तालुक्यात सुरू असलेली पावसाची संततधार आणि चांदोली धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी यामुळे दोन दिवसांपूर्वी वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. यामुळे मांगले-काखे हा पूल आणि तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने शिराळा तालुक्याचा कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटला आहे.