जत (सांगली) - तालूक्यातील तिकोंडी येथे गॅसचा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक ही घटना रविवारी (दि. 21 मार्च) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात अंदाजे सात लाखांचे नूकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गॅस स्फोट होवून घर जळून खाक
अधिक माहिती अशी की, तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांची आई आजारी झाल्याने सकाळी कराड या ठिकाणी उपचारास नेण्यासाठी तिकोंडी गावात आले होते. परत जाऊन पाहिले असता गॅसचा स्फोट होऊन छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले होते.
दोनच दिवसांपूर्वी शेळी विकून आलेले 25 हजारांची रोख रक्कम जळून खाक
स्फोट इतका भयानक होता की दोन किमी परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला. पण, त्यांना अपयश आले. शुक्रवारी माडग्याळ जनावर बाजारात शेळी विकून आलेले 25 हजार रोख रक्कमेसह संसारोपयोगी साहित्य, 25 हजार रुपये किंमतीची बागेची औषधे, दोन तोळे सोने, दोन तोळे चांदी व 5 पोती ज्वारी व कडधान्ये जळून अंदाजे पाच ते सात लाखांचे नूकसान झाले. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चौधरी कुटुंब पूर्णपणे उघड्यावर
चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. घटनास्थळी उशीरापर्यंत पंचनामासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही.
हेही वाचा - महावसुली सरकारच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सांगलीत भाजपाचे आंदोलन
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे पत्र लक्ष विचलित करणारे; मात्र गृहमंत्री बदलणार नाही - जयंत पाटील