सांगली - कुपवाडमध्ये दिवसा-ढवळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवा उपाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. दत्तात्रय पाटोळे असे, या हत्या झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव आहे. थरारक पाठलाग करत हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करुन हा खून केला आहे. कुपवाड एमआयडीसीमध्ये घडलेल्या या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सांगलीच्या कुपवाड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा शुक्रवारी दिवसा-ढवळ्या निर्घृण खून करण्यात आला आहे. कुपवाड एमआयडीसी याठिकाणी पाटोळे यांचा थरारक पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार करुन हा निर्घृण खून झाला आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी तलवारी व धारदार शस्त्रांनी पाटोळे यांच्यावर हल्ला केला, यामध्ये पाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे एमआयडीसी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दत्तात्रय पाटोळे हे सांगली महापालिका क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पाटोळे यांचा एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांना कामगार पुरवण्याचा व्यवसाय होता.

आज सकाळी पाटोळे कामानिमित्ताने कुपवाड एमआयडीसीमधून मिरज एमआयडीसीकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. १२ च्या सुमारास रोहिणी कोल्डस्टोरेज जवळ मागून दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या तीन हल्लेखोरांनी पाटोळे यांच्यावर हल्ला केला. यावेळी ते खाली पडले आणि धावत रोहिणी अॅग्रोटेक या कारखान्यात घुसले. त्यावेळी त्यांचा थरारक पाठलाग करत हल्लेखोरांनी पुन्हा पाटोळे यांना गाठत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यावेळी डोक्यात, छातीत व इतर ठिकाणी वर्मी घाव बसल्याने पाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या हल्ल्याच्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या एका कामगाराने पाटोळे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी कामगारावरही हल्ला चढवला. या कामगाराच्या हातावर वार झाल्याने कामगार जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमकी हत्या कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याचा आता तपास पोलीस करत आहेत. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या राजकीय नेत्याच्या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.