सांगली - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यावर विटा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बानुरगड याठिकाणी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी बानुरगड या ठिकाणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन समारंभ पार पडला होता.
बहिर्जी नाईक स्मारक भूमिपूजन कार्यक्रम
खानापूर तालुक्यातल्या बानुरगड याठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बहिर्जी नाईक स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 19 जुलै रोजी या कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला होता. तर यानिमित्ताने बानुरगड या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षा, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने समारंभास उपस्थित होते.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
या झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी करून कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी विटा शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर असल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विटा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.