सांगली - दुष्काळी जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या जाचक निकषामुळे हक्काच्या नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागत आहे. आधीच अस्मानी संकटाने उध्वस्त झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे नुकसान भरपाई मिळणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही. अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
डाळिंब पीक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुका म्हणून जत आणि आटपाडी या तालुक्याची ओळख आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबाग शेती केली जाते. पाण्याची तीव्र टंचाई असताना कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब व द्राक्ष पिकावर इथल्या शेतकऱ्याचे उदरनिर्वाह चालते. त्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष फळपीक हे दुष्काळग्रस्त जनतेसाठी वरदान ठरली आहेत. मात्र, दोन वर्षांत अवकाळी पावसाने फळ बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक बागांचे नुकसान झाले आहे.
पिक विम्याचे जाचक निकष
2020 मध्ये अवकाळी पाऊस झाला. यात डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे फळ पिक विमा नुकसानभरपाई मिळणे अडचणीचे झाले आहे. फळपीक विमा भरपाई बाबत राज्य शासनाने 15 दिवस प्रति दिन 25 मिलिमीटर इतका पाऊस असेल तरच भरपाई मिळेल, असा अध्यादेश काढला आहे. हे निकष दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी जाचक ठरले आहेत.
20 हजार शेतकऱ्यांचा विमा योजनेत सहभाग
जत तालुक्यात जवळपास २२ हजार हेक्टर पेक्षा अधिक डाळिंबाचे आणि सुमारे ८ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र आहे. 2020 साली जत तालुक्यातल्या सुमारे 20 हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा मध्ये सहभाग नोंदवत प्रति एकर साडेसहा हजार रुपये विमा रक्कम भरली आहे. अवकाळी पावसाने डाळिंब पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम केला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची वाऱ्यावर सोडल्याचे शेतकरी सांगतात.
निकष विम्या कंपन्यासाठी बदलले
2018 19 साली तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. त्या वेळी राज्य शासनाकडून फळपीक विमा योजनेत सहभाग घेतल्याने त्याची नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी ही मदत जीवदान ठरली. मात्र, यंदा राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या बाबतीत निकष बदलेले आहेत. हे निकष विमा कंपन्यांच्या हिताचे आहे का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे.
हेही वाचा-नारी कुठेही कमी नाही; जंगल वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या महिलेची कहाणी..!